पुणे : पुणे येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली दर्शना पवार हिची हत्या झाल्याचे १८ जून रोजी स्पष्ट झाले. राजगडाचा पायथ्याशी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. तिचा मृतदेह कुचलेल्या अवस्थेत होतो. कारण हत्या १२ जून रोजी झाल्यावर मृतदेह १८ जून रोजी सापडला. तिच्या मृतदेहावर जखमा होत्या. पोस्टमॉर्टम अहवालातून हे स्पष्ट झाले होते. मग सीसीटीव्ही फुटेजची तपासणी झाली. त्यात दर्शना हिची हत्या तिचा मित्र राहुल हंडोरे यांनेच केली असल्याचा संशय निर्माण झाला. अखेर फरार असलेल्या राहुल याला अटक करण्यात आली.
राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईत अटक केली. त्यानंतर न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी घेतली. २९ जूनपर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी पोलीस करत आहे. परंतु पहिले दोन दिवस तो बोलत नव्हता. त्यानंतर त्याने दर्शनाची हत्या का केली? हे सांगण्यास सुरुवात केली. राहुल दर्शना हिला वारंवार लग्नासोबत विचारत होता. परंतु नेहमी ती टाळाटाळ करत होती. ती एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली अन् आपण झालो नाही, यामुळे ती टाळाटाळ करीत असल्याचा समज राहुल याचा झाला, असे त्याने पोलिसांना सांगितले.
दर्शना हिला लग्नासंदर्भात विचारुन अंतिम निर्णय घेण्यासाठी राजगडावर नेले. त्यावेळी तिने नकार दिला तर हल्ला करावा, या हेतूने सोबत ब्लेड कटर खिशात ठेवले. राजगडावर दर्शनाला विचारल्यावर तिने घरच्या मंडळीचे नाव सांगत नकार दिला. मग आमच्यात वाद झाला. त्यावेळी खिशातून ब्लेड कटरने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर दगडाने मारुन तिला संपवले, असे राहुल हंडोरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
दर्शना पवार हिची हत्या केल्यानंतर काहीच झाले नाही, असा देखावा करत राहुल राजगडावरुन उतरला अन् मोटारसायकल घेऊन रवाना झाला. पुणे शहरात राहणे धोकादायक असल्यामुळे सुरुवातीला तो सांगलीला गेला. मग पुढे गोवा गाठले. त्यानंतर चंदीगड, लखनऊ, प्रयागराज येथे गेला. त्यानंतर पुन्हा लखनऊला येऊन हावडा येथे गेला, असे त्याने पोलिसांना सांगितले.
राहुल यांची पोलीस कोठडीची मुदत २९ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडीच घेण्याची मागणी पोलीस न्यायालयात करण्याची शक्यता आहे.