चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टिळक कुटुंबीय नाराज

| Updated on: Mar 29, 2023 | 11:40 AM

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर टिळक कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पुण्यात पक्ष कुठे नसताना पक्ष वाढवण्यासाठी मुक्ता टिळक फिरल्या होत्या. त्यांनी अनेक वर्ष पुणे शहरात काम केले होते, असे टिळक कुटुंबियांनी केला.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टिळक कुटुंबीय नाराज
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : पुणे कसबा पेटनिवडणुकीचे निकाल येऊन आता महिनभर होत आला आहे. परंतु भाजपमधूनच या निवडणुकीवरुन वक्तव्ये करणे अजून थांबलेले नाही. निवडणुकीत उमेदवार देण्यात चूक झाल्याचे महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना उमेदवारी का दिली नाही? याचे कारण चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुन्हा उमटले आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल टिळक कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील


पुणे शहरात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. त्यामुळे टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही.

हे सुद्धा वाचा

टिळक कुटुंबात नाराजी

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर टिळक कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पुण्यात पक्ष कुठे नसताना पक्ष वाढवण्यासाठी मुक्ता टिळक फिरल्या होत्या. त्यांच्या कामाचा मान त्यांनी राखायला हवा होता, असे कुणाल टिळक यांनी म्हटले. आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे सांगताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यला महत्त्व आहे. त्यांना कोण चुकीची माहिती देतं आहे, असा प्रश्न मला पडला आहे. मुक्ता टिळकांच काम होतं त्यामुळे सहानुभूतीची लाट होती. मुक्ताताई आजारी असतानाही मतदारसंघात ते कार्यक्रम घेत होते. त्यांचे 20 ते 25 वर्ष काम होतं आणि त्या कामामुळे लोकांचा संपर्क कायम होता.

मनपात चांगली कामगिरी


भाजपात आता कोणतीही मरगळ नाही. पुणे महापालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा कुणाल टिळक यांनी केला. तसेच पुढच्या वेळेस कसब्यात वेगळं चित्र दिसेल, असे त्यांनी सांगितले.

संजय काकडे काय म्हणाले होते

कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाल्याचे संजय काकडे यांनी मान्य केले होते. आमचे उमेदवार हेमंत रासने यांनीही हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढील विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना टक्कर देणारा उमेदवार देऊ. अन् पुन्हा हा गड भाजपकडे येईल, असे त्यांनी सांगितले.