पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील लोकांनी अनेक विक्रम केले आहेत. पुण्यातून चांगले उद्योजक तयार झाले, शिक्षण तज्ज्ञही तयार झाले. संगीत, नाटक, सिनेमात पुणेकरांचे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रात पुणेकरांनी आपली कामगिरी बजावली आहे. आता पुणे शहरातील एका छोट्या मुलाने मोठी कामगिरी केली आहे. हा मुलगा चक्क मोटिव्हेशन स्पीकर म्हणून चांगले भाषण देतो. त्याच्या भाषणाचे अनेक कार्यक्रम झाले आहे. यामुळे त्याच्या या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.
पुणे रिधान जैन हा मोटिव्हेशनल स्पीकर झाला आहे. विशेष म्हणजे तो सर्वात कमी वयाचा मोटिव्हेशनल स्पीकर बनला आहे. त्याचे वय फक्त नऊ वर्ष आहे आणि तो अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रेरणादायी भाषण देतो. चौथीत शिकणाऱ्या रिधान याने पुणे शहरांमधील विविध शाळा, क्लब आणि इतर ठिकाणी 20 हून अधिक मोटिव्हेशन भाषण दिली आहेत. तो फक्त मुलांसमोर प्रेरणादाई विचार मांडतो असे नाही तर युवक आणि ज्येष्ठांसमोर त्याचे कार्यक्रम होतात.
रिधान हा सर्जनशीलता, चिकाटी आणि शिस्त या विषयांवर भर देत आपले प्रेरणादायी भाषण करतो. वाचन आणि लेखणाचे महत्व तो सांगतो. छोटी, छोटी उदाहरणे देऊन तो एकाच वेळी शेकडो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो. वयाच्या नवव्या वर्षी त्याने आतापर्यंत 20 पेक्षा जास्त कार्यक्रम घेतले आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याचा या दिशेन प्रवास सुरु झाला होता.
रिधान याचा प्रवास वयाच्या सातव्या वर्षी लेखक म्हणून सुरु झाला. सातव्या वर्षी त्याने ‘वन्स अपॉन इन माय माइंड’ हे पहिले पुस्तक लिहिले. हे पुस्तक तरुण वाचकांना मार्गदर्शन करणारे ठरले. आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करावा, हे त्याने या पुस्तकातून मांडले. त्याचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याला व्याख्यानासाठी अनेक आमंत्रणे येऊ लागली आणि त्याची वाटचाल मोटिव्हेशन स्पीकर म्हणून सुरु झाली.