Pune News | पुणे परिसरातील घाटातून प्रवास धोक्याचा, सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली

| Updated on: Sep 24, 2023 | 8:40 AM

Pune News | राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला गेला आहे. पुणे परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली आहे.

Pune News  | पुणे परिसरातील घाटातून प्रवास धोक्याचा, सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली
Follow us on

वेल्हा, पुणे, विनय जगताप | 24 सप्टेंबर 2023 : राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय झाला आहे. या पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला आहे. परंतु अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. पुणे परिसरात गेल्या दोन, तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे पुणे परिसरात वरंध घाट आणि पाबे घाटात दरड कोसळण्याचा धोका असतो. घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाल्यानंतर भोर-महाड भागातील वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी काही दिवसांपूर्वी खुला केला. परंतु आता पाबे घाटात सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली आहे.

दरडी कोसळण्याचे सत्र कायम

सिंहगड, राजगड आणि तोरणा गडासह वेल्हे पानशेत भाग पाबे घाटामुळे जोडला गेला आहे. परंतु खानापूर -रांजणे पाबे घाटात घाटमाथ्यावरील पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी या घाटात दरड कोसळली होती, त्यानंतर पुन्हा शनिवारी भलीमोठी दरड कोसळली. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे. या भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे घाट रस्त्यावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरड हटवण्याचे काम वेगाने

पाबे घाटात दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीनच्या साह्याने मलवा हटवण्याचे काम सुरु केले आहे. स्थानिक मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक तानाजी भोसले, खानापूरचे पोलिस पाटील गणेश सपकाळ, प्रशांत जाधव यांनी दरड हटविण्यासाठी मदत केली. या भागात रुंदीकरण करण्यासाठी दोन्ही बाजूचे डोंगर तोडले गेले आहेत. यामुळे दोन वर्षांपासून दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

का कोसळतात दरड

सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक दरड हटविण्याच्या सुचना वेल्हे तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितले की, वेल्ह्याच्या दुर्गम भागात घाट रस्ता आहे. उंच कड्यातुन हा रस्ता जात आहे. यामुळे डोंगरात दरडी कोसळत आहेत. सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे माती मुरुम दगड उन्मळून दरड कोसळण्याचा घटना घडत आहेत. दरडी हटविण्यासाठी 24 तास यंत्रणा सज्ज ठेवली आहे.