पुणे |1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रम होणार आहे. यावेळी पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्धाटन होणार आहे. त्यानंतर पुणे ते पिंपर चिंचवड हा प्रवास वेगवान होणार आहे. तसेच मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी काही सवलतीही मिळणार आहे. यामुळे नेहमी वाहतूक कोंडीत असणाऱ्या पुणेकरांना आरमदाय अन् मस्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर येणार आहे. सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचे ते लोकार्पण करणार आहेत. शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड फुगेवाडीपर्यंत मेट्रो होती. आता ही मेट्रो सरळ न्यायालयापर्यंत येणार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. अगदी २५ ते ३० मिनिटांमध्ये हा प्रवास होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास पडवडणाऱ्या दरात होणार आहे.
पुणे मेट्रोने प्रवासासाठी सवलत योजनाही आणली आहे. विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत तिकिटदरात देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत शनिवारी आणि रविवारी मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रोची सेवा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर दुपारी ३ वाजेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी मेट्रो खुली होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात आहेत. यावेळी सर्व विरोधकांच्या आघाडीकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चांगल्या कार्यक्रमासाठी येत असताना राजकीय विरोध करणार असतील तर भाजपसुद्धा प्रतिआंदोलन करेल, असा इशारा भाजपाकडून दिला आहे.