पुणे | 11 सप्टेंबर 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे सतत वाढत जाणारे दर, पेट्रोल अन् डिझेल गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यामुळे केंद्र सरकारने इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्सहन देण्याचे धोरण आखले आहे. बाजारात अनेक इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. राज्यात वर्षभरात किती गाड्यांची विक्री झाली आणि कोणत्या शहरात सर्वाधिक गाड्यांची नोंदणी झाली आहे, याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात वर्षभरात 3 लाख 22 हजार 225 इलेक्ट्रीक गाड्यांची नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक नोंदणी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून झाली आहे. राज्यात नोंदणी झालेल्या तब्बल 30 टक्के इलेक्ट्रीक गाड्या या दोन शहरातूनच नोंदवल्या गेल्या आहेत. पुणे अन् पिंपरी चिंचवडमधून 95 हजार इलेक्ट्रीक गाड्यांची नोंदणी झाली असल्याचे परिवहन विभागातील आकडेवारीतून समोर आले आहे. तसेच राज्यात सीएनजी गाड्यांची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. 2023 सप्टेंबर महिन्यापर्यंतच पुणे शहरातून 23 हजार 549 तर पिंपरी चिंचवडमधून 11 हजार 962 गाड्यांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केली गेली आहे.
यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री सर्वाधिक होईल, असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून 32 टक्के सीएनजी गाड्यांची नोंदणी वाढली आहे. पुढील वर्षापर्यंत ही वाढ 45 टक्के जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पेट्रोलची किंमत 107 रुपये प्रतीलिटर असून सीएनजी 92 रुपयांवर आहे. त्याचवेळी इलेक्ट्रीक गाड्या महाग असल्या तरी त्यांना एकाच वेळी खर्च येतो. वारंवार पेट्रोल, डिझेलसारखा खर्च येत नाही. यामुळे काही वर्षांत इलेक्ट्रीक गाड्यांची किंमत रिकव्हर होते. यामुळे या गाड्यांना मागणी वाढली आहे.
पुणे पेट्रोल डिझेल असोशिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपरेल यांनी सांगितले की, सीएनजीची विक्री वाढली आहे. गॅस वितरणाचे नेटवर्क अजून वाढण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सीएनजी पंप नाही. त्यांना शहरात सीएनजी घेण्यासाठी यावे लागते.