रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 7 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपरिषदेत प्रशासक ‘राज’ सुरु आहे. यामुळे जनतेच्या अनेक प्रश्नांवर सरकारी पद्धतीने काम होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पिंपरी चिंचवडमधील लाखो रहिवाशांना गेल्या तीन दिवसांपासून प्रशासक राजचा फटका बसत आहे. या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु मनपात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी कोणीच नाही.
पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे या भागातील रहिवाशी हैराण झाले आहे. 5 ऑक्टोबर रोजी महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कामासाठी बंद ठेवला होता. त्याचा परिणाम सहा रोजी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला. दोन दिवस पाणी नसताना तिसऱ्या दिवशी जास्त वेळ पाणीपुरवठा होईल, असे अपेक्षा नागरिकांना होती. परंतु सात ऑक्टोबरला पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हैराण झाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधीच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीक पाण्याविना असताना दखल घेणारे कोणी नाही. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारायचा कुणी नाही किंवा उत्तरदायित्व घेण्यास कोणी नाही.
पिंपरी- चिंचवड शहरला पवना धरणातून पाणी पुरवठा होता. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पवना धरण भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाले असताना नागरिकांच्या घरात पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनपात प्रशासक राज नसते तर महापौर किंवा नगरसेवकांना जाब जनतेने विचारला असता. परंतु आता जनतेचे ऐकणारे कोणीच नसल्याने तोंडं दाबून बुक्यांचा मार नागरिकांना सहन करावा लागत असल्यासारखा प्रकार झाला आहे.