रणजित जाधव, पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : अनेक घरात श्वान प्रेमी आहेत. अनेक कुटुंबीय घरात श्वान पाळतात. या श्वानची घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात. शहरा शहरात श्वान प्रेमी आणि प्राणी मित्र संघटनाही तयार झाल्या आहेत. श्वानचा वापर पोलीस दलापासून लष्कारापर्यंत केला जातो. या ठिकाणी शाही बडदास्त श्वान म्हणजे कुत्र्यांची ठेवली जाते. परंतु शहरातील भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष होत असते. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता.
पिंपरी चिंचवडजवळ असणाऱ्या किवळे गावातील एका भटक्या कुत्र्याच्या तोंडात प्लॅस्टीकची बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी असल्यामुळे त्याला काहीच खात, पिता येत नव्हते. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याची ही परिस्थिती पाहून अनेकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु भीतीमुळे तो कोणाच्या हाती लागत नव्हता.
परिसरातील त्रिशूल मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या कुत्र्याची माहिती मिळाली. मग त्याला पकडण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरु केले. त्या कार्यकर्त्यांना कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन पथकाला पाचारण केले. इतक्या दिवसांपासून तोंड बरणीत असल्याने त्या कुत्र्याचे तोंड सडू लागले होते. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्याच्या शरीरात त्राण उरला नव्हता.
कुत्र्याची बिकट परिस्थितीमुळे अखेर बरणी कापून त्याचे प्राण वाचण्याचा निर्णय घेतला. त्या कुत्र्याला डॉग रेस्कू टीमकडे पाठवण्यात आले. रेस्कू टीमने त्याला रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी बरणी कापून काढण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले. येत्या काही दिवसांत हे कुत्र ठणठणीत बरा होईल, असे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यावर राबवलेल्या या रेस्कूमुळे प्राणीमित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.