पुणे | 7 सप्टेंबर 2023 : दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होत असतात. रस्त्यांवरील खड्यांवर स्थानिक नागरिकांकडूनही अनेकवेळा आंदोलन केले जाते. त्यानंतर खड्डे जसे थे राहतात. यामुळे काही दिवसांपूर्वी पुणे शहरात खड्ड्यांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती. या विषयावरुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपलिका फटकारले होते. आता पुणे मनपाने बदल करत काही सस्त्यांना व्हिआयपी दर्जा दिला आहे.
पुणे शहरात G-20 परिषद झाली होती. त्यावेळी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. देश-विदेशातील लोक ज्या रस्त्यांवरुन जाणार होते, ते रस्ते दुरुस्त केले गेले होते. केवळ परिषदेसाठी चांगले रस्ते ठेवल्याबद्दल पीएमसीला टीकेचा सामना करावा लागला होता. यामुळे मनपाने आता शहरातील 15 रस्ते निवडले आहे. या रस्ते व्हिआयपी रस्ते म्हणून ओळखले जाणार आहे. या रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभिकरण वेळोवेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
रस्ते निवडताना शहरातील मुख्य रस्त्यांची निवड केली गेली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशनला जोडून असणारे हे रस्ते आहेत. या रस्त्यांवर फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यात येणार आहे. दुभाजक करुन रस्त्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रस्त्यालगतच्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात येणार आहे.