पुणे | 28 सप्टेंबर 2023 : दहा दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन केले जात आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून जय्यत तयारी केली गेली. घराघरातील गणपतींसह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाच्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. सार्वजिनक गणेश मंडळे आकर्षक मिरवणुका काढून विसर्जन करते. तर घराघरातील गणरायाच्या विसर्जनासाठी मनपाने विविध ठिकाणी विसर्जन हौद तयार केले आहे, तसेच फिरते हौदही केले आहे.
पुणे मनपाने गणेश विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, कंटेनर, मंडप आदी व्यवस्था केली आहे. तसेच विसर्जन स्थळी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, सीसीटीव्ही कॅमेरे अशी व्यवस्था केली आहे. शहरात विसर्जन मार्गावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. मुठा नदीवरील १४ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १११ जीवरक्षक तैनात केले आहेत. तसेच प्रत्येक दोन घाटांवर एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
गणेश मंडळांच्या सोयीसाठी टिळक चौक (अलका टॉकीज), साहित्य परिषद-टिळक रोड आणि माती गणपती-नारायण पेठ या तीन ठिकाणी स्वागत मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना मनपाकडून करण्यात आली आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यावर अडचणीच्या काळात संपर्क करता येणार आहे.
पुणे महापालिकेने फिरत्या विसर्जन हौदाचे (150 मोबाईल वॉटर टँक) नियोजन केले आहे. हे हौद असणाऱ्या गाड्यांवर जीपीएस लावले आहे. यामुळे कधी कोणत्या भागात हे हौद असणार याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. पीएमसीने एकूण 150 म्हणजे प्रत्येक प्रभागासाठी 10 हौद तयार केले आहे. त्याची ट्रॅकिंग लिंक उपलब्ध असल्याचे पीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले. फिरत्या हौदाच्या ठिकाणी निर्माल्य जमा करण्याची सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करता येणार आहे. पुणे शहरातील अनेक भाविकांना या योजनेचा लाभ होणार आहे.