पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारीवर नेहमी चर्चा होत असते. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस सतत मोहीम उघडत असतात. परंतु गुन्हेगारीचा आलेख कमी होत नाही. आता पुणे परिवहन महामंडळ लिमिटेच्या 56 वर्षीय चालकाचा खून त्याच्या मित्रांनीच केला आहे. हा खून करण्याचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी पकडले गेले.
पुणे येथील पीएमपीएमएलमध्ये दिवेकर हे चालक म्हणून कार्यरत होते. 15 सप्टेंबर रोजी त्यांचा खून त्यांचे मित्र असलेल्या सोमनाथ कुंभार, रोहित पाटेकर यांनी केला. हे सर्वजण आंबेगावमधील जांभुळवाडीमध्ये राहत होते. चालक दिवेकर एका अपार्टमेंटमध्ये राहत होते तर इतर दोघेजण त्याच्याजवळ एका शेडच्या घरात राहत होते. दिवेकर यांच्याकडून सोमनाथ कुंभार यांने काही महिन्यांपूर्वी 10,000 रुपये घेतले होते. आईच्या उपचारासाठी पैसे हवे असल्याचे सांगत हे पैसे घेतले होते.
15 सप्टेंबर रोजी दिवेकर हे सोमनाथ कुंभार यांच्या घरी दहा हजार रुपये मागण्यासाठी गेले. त्यावेळी रोहित पाटेकर त्या ठिकाणी होते. दोघे जण मद्य प्राशन करत होते. त्यावेळी दोघांनी मिळून दिवेकर यांचा खून केला. सकाळी दिवेकर यांची पत्नी सोमानथ कुंभार यांच्या घरी त्यांना बोलवण्यासाठी गेली. तेव्हा त्यांना दरवाज्याजवळ रक्त दिसले. त्यामुळे ती घाबरून घरी गेली आणि मुलगा वैभव दिवेकर याला सर्व प्रकार सांगितला.
वैभव दिवेकर हे कुंभार यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना वडिलांचा मृतदेह दिसला. आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत होते. ते वैभवला म्हणाले की, तुझ्या वडिलांनी माझ्याकडून दहा हजार रुपये मागितले त्यामुळे मी त्यांना देवाघरी पाठवले. या प्रकरणी वैभव दिवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.