पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने अनेक जण प्रवास करतात. परंतु पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नव्हती. आता ही वाहतूक सुधारण्याचे प्रयत्न PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सुरु केले आहे. पुणे शहरात मेट्रोला जोडून बससेवा सुरु केली आहे. पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकांना शिस्त लावली गेली आहे. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना शनिवार, रविवारी बसमधून प्रवास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुणे शहरात नॉन स्टॉप बससेवा सुरु केली आहे. आता पुणे शहरातील प्रवाशांसाठी आणखी एक योजना सुरु केली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळा म्हणजे पीएमपीएमएलमार्फत पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांत बससेवा केली जाते. सध्या केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनिक आणि मासिक पास दिले जात होते. ग्रामीण भागातील प्रवाशांना पासची सुविधा नव्हती. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. परंतु आता सोमवारपासून ग्रामीण भागातील प्रवाशांना पास सुरु केली आहे. ग्रामीण भागात दैनिक आणि मासिक पास देण्यात येणार आहे. तसेच पीएमपीएमएल बसने १२० रुपयांत दिवसभरात कुठेही प्रवास करता येणार आहे.
पुणे शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना दिवसभर पास सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिवसभराची पास १२० रुपयांमध्ये काढून कुठेही प्रवास करता येणार आहे. यामुळे पर्यटकांची आर्थिक बचत होणार आहे. सिंहगड किल्यापासून शनिवारवाड्यापर्यंत किंवा कात्रजपासून ते पिंपरी चिंचवडपर्यंतचा प्रवास शहर बससेवेने करता येणार आहे.
पीएमपीएमएलने नुकत्याच १९२ वातानुकूलित बस घेतल्या आहेत. यामुळे आयुष्य संपलेल्या बसेस आता बंद केल्या जाणार आहे. पुणे शहरातील प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या बसेस घेतल्या आहेत. तसेच पीएमपीएमएलच्या ताफ्यात टप्पाटप्याने ६५० बस येणार आहेत. यामुळे शहर बसने रोज प्रवास करणाऱ्या दोन लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.