पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. ई-बसेस आल्या आहेत. पुणेकरांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. आता पुणे शहरवासींसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) मोठा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलने वातानुकूलित डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. एकूण २० डबलडेकर बसेस आता पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार आहेत.
पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०२२ मध्ये डबलडेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला संचालक मंडळाची मंजुरी देखील मिळाली होती. आता त्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रक्रिया सुरु करणार आहे. यामुळे येत्या सहा महिन्यांत पुणेकरांचा प्रवास एसी डबलडेकर बसूमधून सुरु होणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बसेस आहेत. परंतु डबलडेकर ई-बसेस नाही. पहिली ई-बस २०१८ मध्ये धावली होती. आता त्यानंतर डबलडेकर ई बस येणार आहे. जुन्या डबलडेकर बसला एकच जिना होता. आता नव्या बसला दोन जिने असणार आहे. ही बस वातानुकूलित असणार आहे. या बसमधील सस्पेन्शन अधिक चांगले असणार आहे. त्यात डिजिटल तिकीट काढता येणार आहे.
लंडनमध्ये धावणाऱ्या बसेससारखा तिचा लूक असणार आहे. या बसची प्रवाशी क्षमता ७० पर्यंत असणार आहे. उभे राहून ४० जण प्रवास करु शकणार आहे. एका बसची किंमत दोन कोटी असणार आहे. १४ फूट ४ इंच असणाऱ्या या बसला मेट्रो स्थानकाचा अडसर येणार नाही. यामुळे पुणेकरांना प्रवाशाची आणखी एक चांगली सुविधा मिळणार आहे. या बसेस कोणत्या मार्गावर चालवण्यात येणार त्याचा निर्णय अजून झाला नाही.