पुणे | 20 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचे दिव्य अनेकांना करावे लागत आहे. कारण पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही. परंतु आता PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी विविध बदल करणे सुरु केले आहे. त्यांनी आधी चालक आणि वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी स्वत: बसमधून प्रवास केला. तसेच अधिकाऱ्यांना शनिवार, रविवारी बसमधून प्रवास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता नॉन स्टॉप बससेवा सुरु केली आहे. ही बस रस्त्यात कुठेच थांबणार नाही.
पुणे महानगर परिवहन मंडळ म्हणजेच PMPML चे नॉन स्टॉप बससेवा सुरु केली आहे. ही सेवा पुणे महानगरपालिका ते भोसरीपर्यंत असणार आहे. वातानुकूलित असणारी ही सेवा कंडाक्टरविरहीत असणार आहे. पुणे महानगरपालिकेपासून सुटल्यावर सरळ भोसरी येथेच बस थांबणार आहे. जलद आणि चांगली सेवा प्रवाशांना मिळावी यासाठी ही बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी या सेवेचे उद्घाटन करताना म्हटले की, प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही दोन बसेस सुरु करत आहोत. प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आम्ही या मार्गावर अधिक बसेस वाढवू. या बस सेवेचा फायदा पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यान प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. विद्यार्थी आणि विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल.
पीएमपीने १९२ वातानुकूलित बस घेतल्या आहेत. या बसेस ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. या बसेसमुळे काही जुन्या आणि कालबाह्य झालेल्या बसेस बाद केल्या जातील. यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळाले. नवीन बसेसे निगडी, चऱ्होली आणि कोथरूड डेपोतून सुटणार आहे. पुणे शहताली सुमारे दोन लाख व्यक्त नियमित शहर बससेवेचा वापर करतात. त्यादृष्टीने बसेसची संख्या कमी आहे. अनेक बसचे आयुर्मान संपले असले तरी पर्याय नसल्यामुळे त्या सुरु आहेत. परंतु आता एकूण ६५० बस टप्पाटप्याने पीएमपीच्या ताफ्यात येणार आहेत. त्यातील ऑगस्ट महिन्यात १९२ बसेस येत आहे.