पुणे : राज्यासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेडही उपलब्ध होताना दिसत नाही. मात्र, या संकटाचा फायदा घेऊन काही विकृत लोक कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी याप्रकरणी बोगस डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत (Pune Police arrest bogus doctor in Shirur).
नेमकं प्रकरण काय?
संबंधिच बोगस डॉक्टरचं खरं नाव महमूद शेख असं आहे. तो कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत होता. तिथे तो स्वत:चं नाव डॉ. महेश पाटील असं वापरत असे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संबंधित बोगस डॉक्टर हा फक्त बारावी पास असल्याचं समोर आलं आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हॉस्पिटल चालवत होता (Pune Police arrest bogus doctor in Shirur).
रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होता. मात्र, पोलिसांनी सोमवारी (12 एप्रिल) त्याच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याची लबाडी चव्हाट्यावर आणली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या मध्यस्तीने भांडण सोडवण्यात आलं. बोगस डॉक्टरवर रांजणगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी इतरस्त्र हलवण्यात आले.
बोगस डॉक्टरचा पर्दाफाश कसा झाला?
बोगस डॉक्टर महमूद शेख हा कारेगाव भागामध्ये महेश पाटील असे नाव वापरून हा गोरख धंदा चालवत होता. मात्र काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. आरोपीला त्याच्या कुटुंबियांचा फोन आला तेव्हा तू त्यांच्याशी हिंदी भाषेत संभाषण करायचा. फोनवर बोलताना तो फूफा, अम्मी, अबू असे शब्दप्रयोग करायचा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयावर छापा टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला.
हेही वाचा : पुणे-पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना