पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई (Crime News) केल्यानंतरही कोयता गँगचा उद्योग सुरु आहे. कोयता गँगविरोधातील मोठी कारवाई पुणे पोलीस करत आहे. आता सोनसाखळी चोरणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केले आहे.
धुमस्टाईल महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यांकडून सोनसाखळी चोरीच्या दहा घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महागडया दुचाकीसह 13 तोळे सोन्याचे दागिने आरोपींकडून जप्त केले.
कोण आहेत आरोपी
गजानन दत्तात्रय बोर्हाडे (वय 30, रा. हिवरकर मळा, सासवड,पुणे),ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय 20, रा. देवाची ऊरळी मंतरवाडी ,पुणे) राजु महादेव डेंगळे (वय 19, रा. कात्रज कोंढवा रोड,पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवली. तसेच सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीला पकडले.
गुन्हेगारी वाढली
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.