पुणे | 23 जुलै 2023 : गुन्हेगार किती हुशार असला तरी गुन्हा करताना काही तरी पुरावा सोडून जातो. गुन्हेगारापेक्षाही पुढचा विचार पोलीस नेहमी करतात. त्यामुळे अनेक फरार गुन्हेगारसुद्धा पोलिसांच्या सापळ्यात येतात. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या लूट प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगाराचा छडा लावला आहे. ‘आई’ या नावामुळे पोलिसांना गुन्हगाराचा छडा लागला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
पुणे शहरातील तंबाखू व्यापारी लतेश सुरतवाला हे १९ जुलै रोजी आपल्या दुकानातून घरी जात होते. यावेळी गणेश क्रीडा मंचाजवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलीतून गोळीबार करत लूट केली. या घटनेत त्यांचे चार लाख रुपये गेले आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी स.प.महाविद्यालयाजवळ असलेल्या गणेश क्रीडा मंचाजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी हल्लेखारांची दुचाकीवर “आई” हे नाव लिहिलेले दिसले. या धाग्यावरुन पर्वती पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. त्यांनी सूरज वाघमोडे (वय २१) या आरोपीला अटक केली. त्याच्यासोबत असलेले दोन साथीदार पळून गेले आहे. सूरज हा मार्केट यार्डमध्ये हमाली काम करतो. त्यानेच इतर दोघांना एक गेम करायचे आहे, असे सांगत सोबत घेतले होते. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले. एका धाग्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास केला आहे.
ही कामगिरी निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक सुनील जगदाळे, अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिल तांबोळी यांनी केली.