पदभार स्वीकारताच IPS अमितेश कुमार यांचा खाक्या, पोलीस आयुक्तालयातच अट्टल गुन्हेगारांची परेड

| Updated on: Feb 06, 2024 | 5:31 PM

पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अट्टल गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवला आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. या गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.

पदभार स्वीकारताच IPS अमितेश कुमार यांचा खाक्या, पोलीस आयुक्तालयातच अट्टल गुन्हेगारांची परेड
Follow us on

पुणे | 6 फेब्रुवारी 2024 : पुण्यात IPS अमितेश कुमार यांची बदली झाली आहे. IPS अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत. पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद, कोयदा गँगचा हैदोस आणि टोळीयुद्ध या घटनांचा विचार करता नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार कामाला लागले आहेत. अमितश कुमार यांनी पुणे आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर लगेच पुण्यातील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात हजर केलं. त्यांनी सर्व गुन्हेगारांनी ओळख परेड घेतली. या ओळख परेडला जवळपास 300 ते 350 गुन्हेगारांचा समावेश होता. यामध्ये अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता. विशेष म्हणजे पुण्यातला खतरनाक गुन्हेगार गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांचादेखील यात समावेश होता.

अमितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गज्या मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळसह अनेक जणांची ओळख परेड करण्यात आली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, नवीन पोलीस आयुक्तांना संपूर्ण शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती असावी या हेतून सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आली. पोलीस आयुक्तांकडून आज पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात आज सर्व गुन्हेगार हजर करण्यात आले. या गुन्हेगारांची माहिती आपल्याला असावी, तसेच भविष्यातील कारवाई कशी असेल, जे गुन्हे प्रलंबित आहे त्याबाबत पुढची प्रक्रिया कशी असावी यासाठी गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली.

आयुक्तांनी अशी घेतली ओळख परेड

पुणे शहरात सक्रिय असणाऱ्या टोळ्यांची साखळी तोडणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी पोलिसांकडून आता कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात सराईत गुन्हेगार शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. अतिशय निर्घृणपणे भर दिवसा ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांची जाणीव नव्या पोलीस आयुक्तांना आहे. त्यामुळे त्यांनी ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी लगेच आता कार्यवाहीदेखील सुरु केल्याचं बघायला मिळत आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रत्येक गुन्हेरांकडे गेले. त्यांनी गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर रील्स न बनवण्याचं समज देण्यात आली. दहशत निर्माण होईल, असं कोणतंही कृत्य गुन्हेगारांकडून केलं जाऊ नये, अशी तंबी त्यांच्याकडून देण्यात आली. यावेळी गुन्हेगारांनी आपण कोणतेही रील्स बनवणार नाही, असं सांगितलं. “कोणताही गुन्हा होणार नाही”, अशी कबुली गुन्हेगारांकडून दिली गेली.