कसब्याच्या निवडणुकीत खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ फ्लेक्सची गंभीर दखल; पोलिसांकडून मोठी कारवाई

| Updated on: Feb 17, 2023 | 12:18 PM

नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराजवळ ब्राह्मण समाज नाराज असल्याचे काही फ्लेक्स लागले होते. या फ्लेक्सवरून खळबळ माजली होती. त्यानंतर आता हे फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसब्याच्या निवडणुकीत खळबळ उडवून देणाऱ्या त्या फ्लेक्सची गंभीर दखल; पोलिसांकडून मोठी कारवाई
kasba peth flex
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत खळबळ उडवून देणारे फ्लेक्स लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आम्ही नोटालाच मतदान करणार, असं या पोस्टरमधून ठणकावून सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी हे सांगणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी हे फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचलेला असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना तिकीट मिळेल अशी शक्यता होती. पण टिळक कुटुंबीयांना भाजपने तिकीट नाकारले. त्यामुळे टिळक कुटुंबीय त्यांचे समर्थक नाराज झाले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणूक भरण्याच्या रॅलीतही टिळक कुटुंबीय सामील झाले नव्हते. त्यामुळे भाजपमधील नाराजीनाट्य उघड झाले होते.

हे सुद्धा वाचा

रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसब्यातील ब्राह्मण समाज अधिकच नाराज झाला होता. टिळक कुटुंबीयांना डावलण्यात आल्याने ब्राह्मण समाजाने आपली नाराजी उघड केली होती. त्याचवेळी अज्ञातांनी कसब्यात नाराजीचे फ्लेक्स लावून खळबळ उडवून दिली होती.

कुठे लावले फ्लेक्स?

नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराजवळ ब्राह्मण समाज नाराज असल्याचे काही फ्लेक्स लागले होते. या फ्लेक्सवरून खळबळ माजली होती. त्यानंतर आता हे फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण राजेंद्र शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमचेही ठरले…

“आमचेही ठरले, धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा?, आम्ही दाबणार NOTA” अशा वर्णनाचा फ्लेक्स मोदी गणपती जवळील विजेच्या खांबाला लावला होता. ब्राह्मण समाज व इतर समाज यांच्यात तेढ अथवा शत्रुत्वाच्या द्वेषाच्या भावनेतून हेतूपुरस्सर वाढविण्याच्या उद्देशाने हा फ्लेक्स लावल्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

फडणवीस यांचं मोठं विधान

दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात लागलेल्या या फ्लेक्सवरून भाष्य केले होते. हे बॅनर ब्राह्मण समाजाने लावले नाहीत. हे बॅनर कोणी लावले ते लवकरच सर्वांसमोर येईल असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बरुरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.