पुण्यात तणाव वाढला, पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर, रिक्षा चालकांचं आंदोलन कोणतं वळण घेणार?

| Updated on: Dec 12, 2022 | 9:09 PM

पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी आज आंदोलन पुकारलंय. या आंदोलनाला आता वेगळं स्वरुप मिळताना दिसतंय.

पुण्यात तणाव वाढला, पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर, रिक्षा चालकांचं आंदोलन कोणतं वळण घेणार?
Follow us on

पुणे : पुण्यात रॅपिडो बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी आज आंदोलन पुकारलंय. या आंदोलनाला आता वेगळं स्वरुप मिळताना दिसतंय. कारण रिक्षा चालक आज चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आपल्या रिक्षा आंदोलनस्थळी सोडून ते तिथून निघून गेले आहेत. खरंतर ते जाणार नव्हते. पण जवळपास 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आला.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक रिक्षा चालकांना याआधीच रस्त्यावरुन रिक्षा काढण्याची विनंती केली होती. पण रिक्षा चालकांनी पोलिसांचं ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी रिक्षा चालक आपल्या रिक्षा घटनास्थळी सोडून निघून गेले. तर काही रिक्षा चालकांनी पोलिसांचं म्हणणं ऐकत आपल्या रिक्षा घरी नेल्या.

हे सुद्धा वाचा

रिक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होत असल्याची भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व रिक्षा चालकांना तिथून रिक्षा हटवण्यास सांगितलंय.

या दरम्यान जे रिक्षा चालक आपली रिक्षा घटनास्थळावर सोडून पळून गेलेत त्यांची रिक्षा बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात आलं. त्यानंतर संबंधित रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरटीओ कार्यालयापासून जहांगीर रस्त्याच्या दिशेला रिक्षा चालक निघून गेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील रिक्षा बाजूला हटवल्या. सर्व रिक्षा आरटीओ कार्यालयात नेण्यात आल्या.

पुणे शहरातील दोन किमी परिसर हा रिक्षांनी भरला होता. संगमघाट ते आरटीओ कार्यालय, त्याचबरोबर जहांगीर हॉस्पिटलपर्यंतचा परिसर रिक्षांनी भरलेला होता.

शहरातील रॅपिडो बाईक-टॅक्सी बंद होत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नाहीत, अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर सुरु केल्यानंतर रिक्षा चालक तिथून निघून गेले.