अभिजित पोते, पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुडघूस सुरु असतो. ही गुन्हेगारी मोडताना पोलिसांची दमछाक होत आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतर पुणे येथील गुन्हेगारी कमी होत नाही. गुन्हेगारी प्रकरणानंतर पुणे शहरात मिळणारे अंमली पदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात अनेक वेळा ड्रग्सचा मोठा साठा जप्त झाला आहे. आता चक्क एका कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट उघड झाले आहे.
पुणे येथील ललित पाटील हा कुख्यात आरोपी आहे. तो नेहमी ड्रग्सची तस्करी करत असतो. याप्रकरणी त्याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. ललित पाटील हा वैद्यकीय उपचारासाठी येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात भरती झाला. त्याठिकाणावरुन त्याने अंमली पदार्थांचे रॅकेट सुरु केले. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे? हा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.
पुणे येथील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. या ड्रग्सला MD नावाने ओळखले जाते. या मेफिड्रोनची किंमत तब्बल दोन कोटी आहे. ललित पाटील हे हाय प्रोफाईल रॅकेट रुग्णालयातून चालवत होता. त्याच्यासोबत आणखी दोन तरुण सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कैद्याकडून ससून रुग्णालयातून अंमली पदार्थांचे रॅकेट सुरु होते. या प्रकारामुळे पुणे पोलिसांनाही धक्का बसला आहे. या रॅकेटमध्ये ललित पाटील याच्यासोबत रुग्णालयातील कोणी कर्मचारी आहेत का? त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. पुणे शहरात यापूर्वी ऑनलाईन ड्रग्ज विक्रीचा प्रकार उघड झाला होता.