पुणे | 7 सप्टेंबर 2023 : पुणे, सातारा महामार्गावर लाखोंचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. किकवी गावाच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. गुटख्यासह, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 51 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय शंकर गोगावले आणि संतोष सुभाष गोगावले अशी आरोपींची नाव आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय.
पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२४ तारीख निश्चित करण्यात आली आहे. मुदतीच्या तीन महिन्यांआधी हे काम केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करून आणि अतिरिक्त मनुष्यबळ वापरून हे काम वेळेत पूर्ण करा, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पीएमआरडीएला दिले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल उभारला जात आहे.
पुणे येथील लोहगावमध्ये १०० बेडचे सरकारी रुग्णालय होणार आहे. लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव महामार्गावर मनसे बस थांबा बांधला आहे. खराबवाडी गावात मनसने स्वखर्चाने बस थांबा तयार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाका तिथे शाखा ही खेड तालुक्यातली पहिली शाखा चालू करण्यात आली आहे. या बस थांब्यामुळे अनेक प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जालना लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड शहरात शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी पिंपरी कॅम्प ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात समविचारी संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.