पुणे | 27 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कोयता गँगचा उपद्रव सुरु आहे. व्यापाऱ्यावर हल्ला झाला. बलात्काराची घटनाही घडली. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी बंदोबस्त केला असला तरी गुन्हेगारी कमी होत नाही. यामुळे कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या प्रकरणी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलिसांनी शहरातील ६ हजार ११६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी ६०२ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगाराची घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.
बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची आता खैर नाही. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये २८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील बस स्थानके रेल्वे स्थानक हॉटेल लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी करून संशयित वाहन चालकांची चौकशी केली जात आहे. नाकाबंदीत 934 वाहन चालकांची तपासणी केली आहे. २१३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार काही दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरले होते. पुणे शहरातील सर्व पोलीस चौक्यांमध्ये २४ तास पोलीस राहणार आहेत. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर बडतर्फे आणि निलंबनाची कारवाई रितेश कुमार यांनी केली. या कारवाईनंतर पोलीस दलात चांगली खळबळ माजली होती.