पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एक-एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. 17 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे कार चालवून पुण्यात मध्यरात्री दोघांचा बळी घेतला. दोघेही अभियंते मुळचे मध्यप्रदेशातील होते. कल्याणीनगरमध्ये रविवारी मध्यरात्री हा थरार घडला. याप्रकरणी अजून एक बाब समोर आली आहे. फ्री प्रेस जर्नलने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, आरोपीने मित्रांसोबत त्यादिवशी दारु आणि खाद्यपदार्थांवर 48,000 रुपये खर्च केले होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी अगोदर एका रेस्टॉरंटमध्ये गेला. मित्रांसोबत रात्री 9:30 ते मध्यरात्रीपर्यंत एका रेस्टॉरंटमध्ये दारु पित होता. त्यानंतर त्याने अजून एका हॉटेलमध्ये मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दारु पिली. त्यानंतर तो मित्रांसोबत आलिशान पोर्श कारमधून भरधाव निघाला.
12 वीच्या निकालाची पार्टी
पोलिस तपासात आरोपीने मित्रांना इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री पार्टी दिल्याचे समोर आले आहे. रात्री रात्री 9:30 ते मध्यरात्रीपर्यंत तो मित्रांसोबत पित असलेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी टेबलवर दारुच्या बाटल्यांचा खच पण दिसत आहे. त्यानंतर त्याने दोघांचा कारने ठोकरुन जीव घेतल्याचे समोर आले.
इतर चौघांना केली अटक
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये नमन भुतडा, सचिन काटकर, संदिप सांगळे आणि जयेश बनकर अशी त्यांची नावे आहेत. ते Cosie रेस्टारंट आणि हॉटेल Blak शी संबंधित आहेत.
आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची खैर नाही
आरोपीला पोलिसांनी व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपीला त्यांनी बर्गर आणि पिझ्झा आणून दिला. त्याचा पाहुणचार केल्याचा आरोप झाल्यानंतर प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांची बाजू मांडली. याप्रकरणात एखादा पोलीस चौकशीत, तपास कार्यात अडथळा आणत असल्याचे, आरोपीला सहकार्य करत असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे पोलीस सोशल मीडियावर ट्रोल
सोशल मीडियावर पुणे पोलिसांच्या एकूणच कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तर बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश पण ट्रोल होत आहे. कार अपघातात एखाद्याचा बळी घेतला आणि निबंध लिहिला तर शिक्षा पूर्ण होते का? असा सवाल सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. X वर काहींनी केवळ निंबध लिहिला तर वाहन परवाना मिळतो का? असा उपरोधिक टोला हाणला आहे.अर्थात या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडली आहे.