19 तारखेच्या अपघातानंतर पुण्यातल्या व्यवस्थांवर जे प्रश्न उभे राहिले., त्यानंतर पुणे पोलिसांनी आता जाग आलीय. अनेक रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत पोलीस वाहन चालकांची तपासणी करत आहेत. मात्र या प्रकरणातल्या मूळ मुद्दयांऐवजी याला विविध फाटे फोडले जात आहेत का अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे.तपासाचा भाग म्हणून सर्व बाजूंनी पुढे सरकावं लागतं. मात्र या केसमध्ये मूळ खोड सोडून इतर मुद्दयांनाच जास्त महत्व दिलं जात असल्याचाही आरोप होतोय.
अल्पवयीन मुलगा दारु पिलेला असतानाही त्यावर ड्रँक अँड ड्राईव्ह कलम का लागलं नाही? त्यासाठी कुणाचा दबाव होता. बिल्डरपुत्राला त्या रात्री कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरुन पाठिशी घातलं हा मूळ मुद्दा आहे. आता या केसच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर मुद्द्यांवर जास्त फोकस होतोय. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी अल्पवयीन आरोपीला दारु देणारे दोन बार मॅनेजर, दोन बारमालक अटकेत. तिसऱ्या दिवशी नियम न पाळणाऱ्या 28 पब्स आणि बारवर कारवाया
चौथ्या दिवशी मुद्दा आला आरोपीचा आजोबा सुरेंद्र अग्रवालचे छोटा राजनशी संबंध. अनेक वर्षांपूर्वीची केस चर्चेत.
कायद्यानुसार अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यास पालकाला अटक होते, मात्र आरोपीच्या वडिलांनी ड्रायव्हरला धमकावलं म्हणून या प्रकरणात अटक झाली. नंतर कुठेतरी मूळ या प्रकरणाशी संबंधित दोन पोलीस अधिकारी निलंबित झाले. यानंतर आरोपीची गाडी ठिकठाक होती का याची तपासणी आरटीओनं अपघातानंतर केली. त्या गाडीत काहीही डिफेक्ट नव्हता यासाठी जर्मनीहून एक टीम तपासणीला येणार आहे. रक्ताचे नमुने बदलले म्हणून २ डॉक्टर अटकेत. त्या डॉक्टरांची नियुक्ती कुणी केली यावरुन आरोप.
डॉक्टरांच्या चौकशीसाठी नवी समिती नेमली. पण त्याच समितीच्या अध्यक्षावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घमासान झाले. यानंतर डॉक्टर तावरेनं किती संपत्ती जमवली यासाठी एसीबीला निवेदन दिले गेले. नंतर महाबळेश्वरमध्ये आरोपीच्या आजोबानं बेकायदेशीरपणे बांधलेला रिसॉर्टवर कारवाईचे आदेश आले. म्हणजे भविष्यात या सर्व फांद्या छाटल्याही गेल्या., तरी खोडाला कधीच धक्का लागत नाही हा आजवरच्या अनेक हायप्रोफाईल केसमधला अनुभव आहे.
पुण्यातले अनेक पब्स आणि बारमधून पोलिसांना महिन्याला हजारोंचा हफ्ता मिळत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय.
त्यावरुन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंची नोटीस मिळाल्यास सर्व पुरावे देणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय.
तूर्तास ज्या रात्रीमुळे पुणे पोलिसांसह प्रश्न उभे राहिले., त्या रात्रीनं पोलिसांना जाग केलंय. आता रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु आहे. यंत्राद्वारे चालक दारु पिला आहे की नाही, याची तपासणी होतेय. अपघाताच्या दिवशी दारु तपासणीचं यंत्र होतं की नाही, हा संशोधनाचा विषय असला तरी या घडीला पोलीस आवर्जून तपासणी करत आहेत.