पुणे हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या पॉर्शे कार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील जेलमध्ये आहेत. त्यामुळे अल्पवयीन तरुणाला आत्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अल्पवयीन अरोपीच्या आत्यानेच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे बालसुधारगृहात ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखीव ठेवला होता. यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात अल्पवयीन आरोपीला दिलासा देण्यात आला. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली. मुंबई हायकोर्टाने याबाबत दिलेल्या आदेशात महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. आरोपीला याआधी बाल हक्क न्याय मंडळाने घातलेल्या अटी-शर्ती हायकोर्टाने कायम ठेवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश देताना हायकोर्टाच्या आदेशात महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला 19 मे ला जामीन देताना बाल न्याय मंडळाने घातलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करावे लागणार, असं हायकोर्टाने आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध आणि वाहतुकीच्या नियमांचा 15 दिवसांचा अभ्यास करावाच लागणार आहे.
जामीन मिळाल्यानंतरही २२ मे ला अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. २२ तारखेचा आणि त्यानंतर बालसुधारगृहाला मुक्काम वाढवणारे सर्व आदेश रद्द करत १९ तारखेचा जामीनाचा आदेश हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 19 मे ला जामीन देताना बाल न्याय मंडळाने घातलेल्या अटी-शर्थी अल्पवयीन आरोपीला पूर्ण कराव्या लागणार आहेत.
या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात यावा, असं कोर्टाने म्हटलं. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामुळे आता अल्पवयीन आरोपीची 33 दिवसांनी बालसुधारगृहातून सुटका होत आहे.