पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून खून आणि हाणामारीचे प्रकार घडत आहे. गणपती विसर्जन होत असताना पुणे शहरातील दोन गुंड टोळ्यांमधील वाद समोर आला होता. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी सिंहगड रोडवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाचा खून झाला होता. या घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली असताना पुणे जिल्ह्यात तुफान हाणामारीचा प्रकार पुरंदर तालुक्यातील रावडेवाडीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी महत्वाचे अपडेट दिले आहे.
भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथील वाद शुक्रवारी रात्री झाला होता. हा वाद गावातील विकास कामावरून झाला होता. या वादात झालेल्या मारहाणीमुळे एकाचा मृत्यू झाला होता तर तिघेजण जखमी झाले होते. सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला होता. या हाणामारीत यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
वादानंतर गावात शांतता निर्माण करण्यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचवेळी पोलिसांची पथके तयार करुन आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तसेच इतर सहा आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत.
दोन्ही गटातील वादात मिळेल त्या साहित्याचा आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. तलवार, गज, रॉड यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. तसेच डोळ्यात मसालाही टाकण्यात आलाय. गावात झालेल्या विकास कामाच्या श्रेयावरुन हा वाद झाला आहे. गावात अजून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.