भारतीय रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करत असतात. अनेक जण आरक्षण करुन रेल्वे प्रवास करण्यास प्राधान्य देतात. काही जणांना आरक्षण न मिळाल्याने जनरल तिकीटावर प्रवास करावा लागतो. परंतु काही प्रवाशी चक्क तिकीट न काढता रेल्वेतून प्रवास करतात. पुणे विभागाने रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. या प्रवाशांना तब्बल चार कोटींचा दंड भरावा लागला आहे. 50 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांवर कारवाई करत हा दंड वसूल करण्यात आला आहे.
उन्हाळी सुट्टी, लोकसभा निवडणूक व लग्नसराईमुळे रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्याही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रवाशांची गर्दी कमी झालेली नाही. त्यातच फुकट्या प्रवाशांची भर पडली आहे. यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाकडून धडक कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शोधून त्यांच्याकडून दंड आणि तिकीटाची रक्कम वसूल केली जात आहे. त्यात एप्रिल महिन्यात चार कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागाने एप्रिलमध्ये विशेष मोहीम सुरु केली. या तपासणी मोहीमेत 35,129 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तीन कोटी 12 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 14,446 प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तब्बल 93 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 243 प्रवासी हे सामान बुक न करता प्रवास करत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करत त्यांच्याकडून 33,690 रुपयाचा दंड वसूल केला आहे. एकूण जवळपास चार कोटींचा दंड आकारत ही धडक कारवाई पुणे रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.
01105 पुणे-दानापूर एक्सप्रेस स्पेशल ट्रेन आता 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. ही ट्रेन दर सोमवारी पुणे स्टेशनवरुन रात्री 19.55 वाजता सुटते. तिसऱ्या दिवशी बुधवार सकाळी 4.30 वाजता दानापूर स्टेशनवर पोहचते. तसेच 01106 दानापूर-पुणे एक्सप्रेस स्पेशल ट्रेन 26 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. ही ट्रेन बुधवारी दानापूर स्टेशनवरुन सकाळी 6.30 वाजता सुटते. गुरुवार संध्याकाळी 05.35 वाजता पुणे स्टेशनवर पोहचते.