पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे रेल्वे स्थानकावर देशभरातून प्रवासी येतात. परंतु अनेक जण तिकीट काढत नाही. यामुळे पुणे रेल्वे विभागात गेल्या महिन्याभरात फुकटे प्रवासी वाढले आहे. एका महिन्यात पुण्यात 18 हजार प्रवाशांवर कारवाई झाली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या 18 हजार लोकांवर पुणे रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या लोकांकडून एकूण 1 कोटी 42 लाख रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकात दररोज प्रवाशांची तपासणी करण्यात येते. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते.
पुणे येथील डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात अडकले होते. प्रदीप कुरुलकर यांचा जामीनावर आता सुनावणी होणार आहे. कुरुलकर यांच्या जामीनावर 16 ऑक्टोबर रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. प्रदीप कुरुलकर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात पोलिसांकडून आरोप पत्र देखील दाखल झाले आहे. यामुळे प्रदीप कुरुलकर यांना जामीन मंजूर करा, असा अर्ज त्यांचा वकीलाकडून न्यायालयात करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांची आता दररोज तपासणी होणार आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. रुग्णालयांच्या तपासणीसाठी पुणे महानगरपालिकेकडून अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन सहाय्यक आरोग्य अधिकारी रुग्णालयांची तपासणी करणार आहेत. पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध आणि इतर वस्तूंची कमतरता नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. माधवन यांनी स्वीकारली आहे. माधवन यांनी सूत्र स्वीकारताच विद्यार्थी, संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. आर. माधवन यांनी अभिनेता म्हणून तमीळ, तेलुगू, कन्नड, हिंदी चित्रपसृष्टीत दीर्घकाळ काम केले आहे. त्यांना शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सूत्र घेतल्यानंतर नियामक परिषद, विद्या परिषद, स्थायी वित्त समितीचे अध्यक्ष म्हणून बैठका घेतल्या.
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बाह्य वळणावर अज्ञात वाहनाने बिबट्यास जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात हा बिबट्या पुणे नाशिक महामार्गावर आला असावा, असा अंदाज आहे. अपघात बिबट्याच्या मनक्याला जोरदार मार लागला आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.