Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर तिकीट विक्री रोखणारा पहिला प्रयोग, सतत 24 तास असे ठेवणार लक्ष

| Updated on: Sep 01, 2023 | 12:10 PM

Pune News : पुणे रेल्वे स्थानक अधिकच हायटेक होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आता २४ तास प्रत्येक हालचालीवर लक्ष असणार आहे. प्रथमच हा प्रयोग प्रायोगिक पातळीवर केले जाणार आहे. नेमका काय आहे हा प्रोजेक्ट जाणून घेऊ या...

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर तिकीट विक्री रोखणारा पहिला प्रयोग, सतत 24 तास असे ठेवणार लक्ष
pune railway
Follow us on

पुणे | 1 सप्टेंबर 2023 : कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकिटांची बेकायदेशीर विक्री हा प्रकार अनेकवेळा घडत असतो. विशेषत: तत्काल तिकीट एक, दोन मिनिटांत संपतात. यामुळे अनेक प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. यासाठी बेकायदेशीर तिकीट विक्रीची साखळीच कारणीभूत असते. आता ही तिकीट विक्री रोखली जाणार आहे. यासाठी पुणे शहरातील रेल्वे स्थानकावर पहिला प्रयोग केला जाणार आहे. यामुळे २४ तास प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय (artificial intelligence) असणारे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

चार कॅमेरे ठेवणार लक्ष

पुणे रेल्वे स्थानकावर जिओ कंपनीकडून एआय असलेले चार कॅमेरे येत्या पंधरा दिवसांत बसवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर असणारा हा प्रयोग ३० दिवस चालणार आहे. ३० दिवसानंतर यासंदर्भातील अहवाल पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. चार कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा प्रवेश करताना दुसरा बाहेर पडताना तर इतर दोन कॅमेरे आरक्षण केंद्रात लावण्यात येणार आहे. हे सर्वांना लक्ष ठेवणार आहे.

एआय कॅमेऱ्याचे वेगळेपण काय

एआय असणारे हे कॅमेरे इतरांपेक्षा वेगळे असणार आहे. या कॅमेऱ्याची नजर प्रत्येक हालचालींवर असणार आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तापमानसुद्धा हे ओळखणार आहे. यामुळे बेकायदेशीर तिकीट विक्री करणारे लगेच नजरेत येणार आहेत. तसेच या परिसरात किंवा रांगेत किती जण उभे आहेत, त्याची गणनासुद्धा हे कॅमेरे करणार आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या काय आहे परिस्थिती

पुणे रेल्वे स्थानकावर सध्या ६१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच ६५ कॅमेर मार्च २०२४ पर्यंत लावण्यात येणार आहेत. परंतु प्रथमच एआय असणारे कॅमेरे लावले जात आहेत. यासंदर्भात बोलताना पुणे रेल्वेचे डिव्हिजनल कमर्शिय मॅनेजर रामदास भिसे म्हणाले की, रेल्वेकडे अनेक खासगी कंपन्या आपला प्रोजेक्ट देतात. त्यातील एक हा प्रोजक्ट आहे. या प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. यामुळे बेकायदेशीर तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची साखळी रोखली जाणार आहे.