पुणे | 3 सप्टेंबर 2023 : बनावट अधिकारी असल्याची प्रकरणे पुणे शहरात अधूनमधून उघड होत आहे. विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा या बनावट अधिकाऱ्यांकडून केले जाते. काही महिन्यांपूर्वी दोन, तीन प्रकरणे उघड झाली होती. पुणे शहरात कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी किंगडम ऑफ टोंगा या विद्यापीठाला पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगत किरण पटेल याने फसवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी म्हणणारा तोतया आयएएस अधिकारी वासुदेव निवृत्ती तायडे याला पुणे शहरात अटक झाली होती. आता पुणे शहरात लष्कराचा बनावट अधिकारी सापडला आहे.
पुणे रेल्वे पोलिसांनी नीरज विक्रम विश्वकर्मा (20) याला लष्कारी पकडले. भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. नीरज विश्वकर्मा हा उत्तर प्रदेशातील आहे. त्याने यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लष्करी गणवेशात लाल किल्ल्यात प्रवेश केला होता. प्रचंड सुरक्षा असताना लेफ्टनंट रँकचा ड्रेस परिधान करुन तो दाखल झाला होता. त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी गणवेशातील असे अनेक फोटो मिळून आले. लष्करात मोठ्या पदावर असल्याचे दाखवणारे अनेक फोटो त्यांच्याकडे आहे.
विक्रम विश्वकर्मा याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे अनेक चिंता व्यक्त करणारे पुरावे मिळाले. त्याच्याकडे बनावट कॅन्टीन कार्ड मिळाले आहे. लष्करी कॅन्टीनचे हे कार्ड फक्त सेवेत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यात येते. ते कार्ड विक्रम विश्वकर्माकडे कसे आले? हा एक प्रश्न आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडे दिले आहे.
लष्कराचा बनावट उच्च अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विक्रम विश्वकर्मा याचा उद्देश काय होता? तो देशविरोधी कृत्यात अडकला होता का? त्याचे कोणाशी संबंध आहे का? तो बनावट लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा एकटा आहे की अन्य कोणी त्याच्याबरोबर आहे. या सर्व प्रश्नांची चौकशी केली जात आहे.