पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : पुणे रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्याविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. एका दिवसांत फुकट्या प्रवाशांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने एका दिवसात ११ लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे ते दौंड या सेक्शनमध्ये जवळपास ४५ गाड्यांची तपासणी केली. त्यानंतर १३१७ विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. एकाच दिवसांत केली गेलेली ही गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी कारवाई आहे. ही मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.
पुणे विभागात निघालेल्या म्हाडाच्या घरांच्या अर्जाची मुदत वाढवली आहे. आता ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण ५ हजार ८५३ घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ४५ हजार जणांनी अर्ज केले आहे. यापूर्वी म्हाडाच्या अर्जासाठी २७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती. ती आता वाढवण्यात आली आहे.
मावळ तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जाते. मावळात पाऊस नसल्यामुळे भात कापणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतातील ग्रामदैवताची पूजा करून कापणी सुरु केली आहे. पावसाचा अंदाज घेत नुकसान टाळण्यासाठी शेतकरी राजा भात कापणी लवकर करत आहे. भात घरामध्ये सुरक्षित आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यासाठी अजित पवार यांनी माजी नगरसेवकांची बैठक शनिवारी दुपारी बोलवली आहे. माजी नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. अजित पवार यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते बैठक घेत आहे. पुणे महापालिका ही भाजपच्या ताब्यात होती.
पुण्याच्या भोर तालुक्यात होणाऱ्या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि 19 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल केले जात आहे. इच्छुकांकडून सरपंच पदासाठी 64 तर सदस्यपदासाठी 261 उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.