पुणे : कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता पुणे जिल्ह्यातही पुराचं थैमान पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 420 गावांना पुराचा फटका बसलाय. या पुरात आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय. याशिवाय तब्बल 700 लोकांना प्रशासनानं स्थलांतरित केलंय. दुसरीकडे 3 हजार 114 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 6 जनावरे पाण्यात वाहून गेल्याचीही माहिती समोर आलीय.
पुण्यात मुळशी आणि वेल्हा तालूक्याला पुराचा सर्वात मोठा फटका बसला आहे.
मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज (23 जुलै) सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.
गेल्या 24 तासांपासून पुणे, जुन्नर, खेड या भागांत दमदार पाऊस कोसळतोय. त्यातही भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोपदाप पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय.
मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळुन तेच पाणी मंदिरात आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना एन्ट्री नाहीय. मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पुजा-अर्चा सुरु असते. मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.
Pune rain flood affect 420 villages 700 people displaced