मागील वर्षी रुसलेल्या पावसाची सुरुवात यंदा चांगली झाली आहे. पुणे शहरात गेल्या तीन, चार दिवस जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने पुणे शहरातील जून महिन्याची सरासरीही ओलांडली आहे. तसेच वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या वार्षिक सरासरीच्या ४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत सुमारे ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरच पाण्याखाली गेले होते. शिवाजीनगर येथे ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. १९९१नंतर प्रथमच एका दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदवला गेला. जूनच्या सरासरीच्या जवळपास ६४ टक्के पाऊस एकाच दिवसात पडला होता.
पुणे शहरात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली. शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. या प्रकाराचे खापर खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहे.
पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांकडे केलेले दुर्लक्ष आणि महापालिकेने नैसर्गिक नाले बुजविण्याच्या केलेल्या पापामुळेच शनिवारच्या पावसात शहर पाण्याखाली गेले आहे, असा आरोप भाजपच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
तीन दिवसांच्या पावसानंतर देखील खडकवासला धरण साखळी क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 4.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्राचा पाणीसाठा वाढवण्यासाठी 120 मिलिमीटर पावसाची गरज आहे.
राज्यभर झालेल्या पावसामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी तर मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, शेवगा या भाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी झाली आहे. परंतु पुण्यातील बाजारात टोमॅटोचे भाव उतरले आहेत. फुलांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. आवक घटल्याने फुलांचे देखील भाव वधारले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात तुफान पाऊस झाला आहे. सलग पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे सीना – भोगावती नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दुष्काळगृस्त भागात पावसाने जोरदार बॅटींग केल्यामुळे शेतकरी राजा आनंदात आहे. मोहोळ तालुक्यातील मालिकपेठ, एकुरके, भोयरे, हिंगणी, बोपले भागातील शेतात साचले पाणी तर कांही ठिकाणी बंधारे फुटून पाणी वाहू लागले आहे.