राजगुरुनगर, पुणे : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सलग चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आज पाचव्या दिवशीही संपाचे पडसाद उमटत आहे. या संपाचा राज्यभरात परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील एका युवकाचा नातेवाईकांना हा संपाचा फटका बसला. आधीच दु:खात असलेले हे नातेवाईक डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
नातेवाईक रात्रभर थांबले
बिबट्याच्या हल्ल्यात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी पुणे जिल्ह्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणला. परंतु संप असल्यामुळे डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. नातेवाईक मृतदेह घेवून रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर होते. परंतु त्यानंतरही डॉक्टरांनी शवविच्छेदन केले नाही. अखेरी रुग्णालयात खेड पोलीस दाखल झाले.
पेन्शनच्या मागणीसाठी डॉक्टर संपावर गेले आहे. परंतु डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरु नये, त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी सर्व मार्गांचा जरुर अवलंबन करावा. त्याचवेळी आपल एक डॉक्टर आहोत, तातडीची रुग्णसेवा करणे आपले काम आहे, हे लक्षात घ्यावे, असा सूर सामान्यांकडून व्यक्त होत आहे.
खेडमध्ये हाणामारीची घटना
खेड तालुक्यातील दोंदे येथे दोन कुटुंबामध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती यावेळी वैभव बोऱ्हाडे याच्या पत्नीला मारहाण झाल्याने तक्रार देण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान क्षितिज दांडगे हा तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोंघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते.
दरम्यान झालेल्या प्रकरणावरून दोंघामध्ये पुन्हा पोलिस ठाण्यात बाचाबाची झाली यावेळी राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे यांने खिशातील ब्लेड काढून क्षितिज यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात क्षितिज गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असुन आधिक तपास सुरु केलाय