अभिजित पोते, पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सवाचे वेध देशभरातील भाविकांना असते. पुणे, मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातीलच नाही तर विदेशातूनही भाविक येतात. १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवासाठी घराघरात तयारी सुरु आहे. त्याचवेळी गणेश मंडळांनी आरास पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. पुणे शहरातील दगडूशेठ गणपती मंडळाकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे. त्याचवेळी रविवार पेठेतील गणेश मंडळाने राजकीय देखावा केला आहे.
पुणे शहरातील गणेश मंडळांचा देखावा नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे पुण्यातील गणपती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची मांदियाळी जमा होते. पुणे येथील गणेश मंडळे समाजात घडत असलेल्या घडामोडींवर देखावे करतात. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न गणेश मंडळांचा असतो. आता पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार सतीश तारू यांनी बनवलेला देखाव्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी बनवलेला राजकीय देखावा सध्याच्या परिस्थितीवर समर्थक ठरत आहे.
सतीश तारू यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर देखावा तयार केला आहे. राज्यात ज्या पद्धतीने सध्याचे राजकारण सुरु आहे, त्यावर हा देखावा आहे. या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था कशी झाली आहे ते त्यांनी देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळे झेंडे हातात घेतलेले दिसत आहे. ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’, असे साकडे घालत विठ्ठलालाच प्रश्न विचारताना दिसत आहेत.
रविवार पेठेतील एका गणेश मंडळाने हा राजकीय देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे या अनोखा देखाव्याची चर्चा गणेशोत्सवाआधीच सुरु झाली आहे. सतीश तारु यांनी स्त्रीभ्रूण हत्या, गड संवर्धन शैक्षणिक, कौटुंबिक आणि राजकीय असे देखावे आजपर्यंत सादर केले आहे. त्याची चांगली चर्चा झाली होती.