पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचवेळी पुणे शहर आणि जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहे. त्याठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. आता पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात रिक्षाच प्रवाशांसह विहिरीत पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे सोमवारी रात्रीच्या वेळेस अपघात झाला. या मार्गावरुन जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच 12 क्यूई 7706) ही विहिरीत पडली. रिक्षेतून प्रवासी प्रवास करत होते. त्यात दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका दाम्पत्याचा समावेश होता. विहिरीत पडलेल्या दोघांना जीवंत रेस्क्यू टीमने सकाळीच बाहेर काढले.
रिक्षेतून दोघांना जिवंत काढण्यात आल्यानंतर अजून तीन जण अजूनही विहिरीत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने पुन्हा बचावकार्य सुरु केले. त्यानंतर तिघांचा मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आले. या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील आहे. जखमींना सासवडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले एक नवविवाहित दाम्पत्य रिक्षेतून प्रवास करत होते. अपघातात ते ही विहिरीत पडले. श्रावणी संदीप शेलार (वय 17), रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18 ) या तिघांचा मृत्यू झाला आहे.लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात होते. परंतु संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच या नवदांम्पत्याचा अंत झाला. आदित्य मधुकर घोलप (वय 22), शितल संदीप शेलार (वय 35) हे जखमी झाले आहेत. सर्व जण पुणे शहरातील रहिवाशी आहे. भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि रेस्क्यू टीमकडून यासाठी प्रयत्न केले. या घटनेचा पोलिसांनी सुरु केला आहे. त्यानंतर अपघात कसा झाला हे स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा
दोन दिवसांपूर्वी लग्न झाले, दाम्पत्य रिक्षेने जात होते, रिक्षा विहिरीत पडली अन्…