Ring Road Project : पुणे शहराची वाहतूक समस्या सोडवणाऱ्या प्रकल्पाबाबत महत्वाचे अपडेट

| Updated on: Sep 14, 2023 | 10:37 AM

Pune Ring Road Project : पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वाचा प्रकल्प आता लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात एमएसआरडीसीकडून महत्वाचे अपडेट आले आहे. पुणे मेट्रोनंतर हा प्रकल्प महत्वकांक्षी असणार आहे.

Ring Road Project : पुणे शहराची वाहतूक समस्या सोडवणाऱ्या प्रकल्पाबाबत महत्वाचे अपडेट
Pune Ring Road
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सर्वात मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पुणे शहरातून अनेक कंपन्या जात असल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. पुण्यातील चांदणी चौकातील पूल कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधल्यानंतर या ठिकाणाची वाहतूक कोंडी मिटली नाही. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणे शहरात दोन, चार किलोमीटर जाण्यासाठी अर्धातासापेक्षा जास्त वेळ लागत आहे. यामुळे या सर्वांवर उपाय ठरणारा प्रकल्प सुरु होणार आहे. यासंदर्भात महत्वाचे अपडेट एमएसआरडीसी म्हणजेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आले आहे.

काय आहे प्रकल्प

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्प तयार करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्याकडे आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. या प्रकल्पासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाचे सचिव सचिन कोठेकर यांनी ही अधिसूचना काढली आहे.

कसा असणार प्रकल्प

रिंग रोड प्रकल्प खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यातून जाणार आहे. ४४ गावांमधून हा प्रकल्प जाणार असून तो कोणत्या गावातून कोणत्या गटातून जाणार आहे, यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे. पहिल्या टप्पात पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची कारवाई करण्यात आली. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक समस्या सुटणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात असणार दोन रिंग रोड

पुणे शहरात दोन रिंग रोड प्रकल्प असणार आहे. १५ ते २० किलोमीटरवर हे रिंगरोड असणार आहे. यासंदर्भात बोलताना पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी म्हटले आहे की, हा रिंग रोड खेड तालुक्यातील सोलू गावातून सुरु होणार आहे.

असा असणार रिंगरोड प्रकल्प

पुणे शहराभोवती 172 किलोमीटर रिंगरोड केला जाणार आहे. त्यासाठी आता अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1900 हेक्टर जमिनीचे संपादन केली जाणार आहे. 26 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.