पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील जीवन रेषा असलेली नदी कोणती? हा प्रश्न विचारल्यावर पुणेकरांकडून सेंकदाचा वेळ न लागता उत्तर येईल. पुणे शहरातील मुळा-मुठा नदी ही सर्वात जुनी आहे. अगदी गंगा नदीपेक्षाही जुनी ही नदी आहे. या नदीला ऐतिहासिक महत्व आहे. परंतु आता प्रदूषणामुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुठा नदी पुण्यापासून पश्चिमेला सुमारे ३५ किलोमीटर लांब प्रवास करत पुणे शहरात दाखल होते. त्यात खडकवासला धरणाच्या अलीकडे आंबी आणि मोशी या मुठा नदीच्या उपनद्यांचा संगम होतो. त्यानंतर हा प्रवाह पुढे मुठे नदीला मिळतो. या जागेला मुळा-मुठा संगम म्हणतात. या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर आहे.
पुणे येथील इतिहासकार डॉ. पी.के. घाणेकर यांनी मुळा, मुठा नदीसंदर्भात पौराणिक कथा सांगितली. त्यानुसार, जुन्या काळात राजा गजनक होते. त्यांनी सह्याद्री पर्वतावर कठोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येमुळे इंद्र देवाला धोका वाटू लागला. इंद्र देवाने त्यांची तपस्या भंग करण्यासाठी दोन अप्सरांना पाठवले. त्या राजाची तपस्या भंग करु लागल्या. तेव्हा राजा गजनक यांनी त्यांना शाप दिला. त्या शापामुळे त्या अप्सरा मुळा, मुठा नद्या बनल्या. पुढे भीमा नदीत मिळाल्यावर या नद्यांना मुक्ती मिळाली.
मुळा, मुळा नद्या या सह्याद्री पर्वता इतक्या जुन्या आहेत. म्हणजेच हिमालय आणि गंगा नदीपेक्षाही जुन्या आहेत. या नदीवर पानशेत आणि खडकवासला धरण बांधले गेले आहे. या दोन्ही नद्या पुणे शहराच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. मुळा सह्याद्री पर्वतावरुन पुणे उत्तर-पश्चिम दिशेकडे येते. या नदीच्या मार्गात पौड, नंदे ही गावे येतात. पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी हिंजेवाडी, बालेवाडी, पिंपरी-चिंचवडमधून ही नदी पुणे शहराच्या पश्चिमेकडे येते.
पुणे शहराचे वैभव आणि जीवन रेषा म्हणून मुळा, मुठा नदी ओळखली जाते. परंतु प्रदूषण आणि अतिक्रणामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे पर्यावरणप्रेमीच नाही तर प्रत्येक पुणेकरांना चिंता वाटू लागली आहे.