पुणे : बारामती तालुक्यातील सुपे येथील बाजार मैदानानजीक महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून चार दरोडेखोर सुसाट निघाले होते. पाथर्डीच्या दिशेने निघालेल्या या दरोडोखोरांना पकडण्यसाठी पोलिसांना अलर्ट मिळाला. पाथर्डी पोलिसांपैकी केवळ एकाचकडे शस्त्र होते तर दरोडेखोर सशस्त्र होते. परंतु त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर गाडी आडवी लावली. मग बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे दरोडेखोर कोणताही विचार न करता सुसाट निघाले होते. त्यांनी रस्त्यावर लावलेल्या पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये पोलिसांची गाडी फिरली. परंतु सुदैवाने पोलिस बचावले. पण पोलीसही थांबले नाही. त्यांनी पाठलाग सुरु केला अन् एकाला पकडण्यात यश आले. शुक्रवारी रात्री दीड वाजता रंगले नाट्य पोलिसांनी सांगितले तेव्हा बॉलीवूड चित्रपटाचा थरार समजला.
काय झाले होते
महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दरोडेखोरांना बाहेर उभे असलेल्या सागर चांदागुडे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दरोडेखोराने गोळी झाडली. यात चांदागुडे जखमी झाले. अशोक बोरकर यांच्या पोटाला दोन गोळ्या चाटून गेल्या, तर सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर दरोडेखोर पाथर्डी हद्दीतून जात असल्याचा संदेश पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दूरध्वनीद्वारे दिला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने माणिकदौंडी-पाथर्डी रस्त्यावर रांजणी फाट्यावर सापळा लावला.
सुदैवाने पोलीस बचावले
दुसरे पथक केळवंडी थांबले. काही वेळाने आरोपींची गाडी केळवंडी शिवारात आली. रांजणी फाट्यावर आरोपींची गाडी दिसताच पोलिसांनी त्यांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली. परंतु दरोडेखोरांनी गाडीला जोरदार धडक दिली. त्यात पोलिसांची गाडी फिरली. मात्र, पोलिस सुदैवाने बचावले. गाडीच्या काचा फुटल्याने आरोपींना वाटले की पोलिसांनी गोळीबार केला. मग ते पाथर्डीच्या दिशेने अजून सुसाट पळाले.
पाठलाग कायम
पोलिसांनी पाठलाग सुरु ठेवला. पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर एक पथक त्यांना रोखण्यासाठी उभे होते. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पळाले. शेवटी निवडुंगे शिवारात गाडी सोडून आरोपी पळून गेले. त्यातील प्रदीप भैय्यालाल भिसेन (रा.गोंदिया) हा शेतात लपून बसला होता. त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. तर दोन आरोपी पळून गेले.