पुणे | 22 जुलै 2023 : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी बसेसची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फ्लाईंग स्कॉड तयार केला गेला आहे. या स्कॉडकडून अनेक वाहनांची तपासणी केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना वाहन मालकांकडून मोठा दंड वसूल केला जात आहे. लाखो रुपये दंड आतापर्यंत झाला आहे.
पुणे आरटीओने 709 शालेय बसेसची तपासणी केली. त्यातील 178 शालेय बसेवर नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई केली गेली आहे. तसेच 417 स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर 84 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी कारवाई संदर्भात सांगितले की, गेल्या काही दिवसांत आम्ही 709 बसेसची तपासणी केली. त्यातील 178 बसेस आणि 84 इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 29 लाख 75 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शालेय मुलांची सुरक्षा हा खूप संवेदनशील विषय आहे. यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर धडक कारवाई केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शालेय बसेसच्या तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय बसेसच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करु नये, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. त्यासंदर्भात आरटीओ, पुणे वाहतूक पोलिसांची एक बैठक आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली होती. त्यानुसार आरटीओकडून कारवाई करण्यात आली.
शालेय बसेसच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. त्यासाठी https://schoolbussafetypune.org ही बेबसाईट लॉन्च केली आहे. त्यात 5,731 बसेसची नोंदणी झाली आहे. मुलांच्या बसेसमध्ये पुरुष हेल्पर तर मुलींच्या बसेसमध्ये महिला हेल्पर ठेवणे सक्तीचे केले आहे. चालक चांगला प्रशिक्षित आणि त्याचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे, असे आदेश आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहे.