अभिजित पोते, पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे ससून रुग्णालयात येरवडा कारगृहातील कैदी उपचारासाठी येतात. परंतु उपाचाराच्या नावाखाली रुग्णालयात वेगळाच प्रकार सुरु असल्याची घटना समोर आली. रुग्णालयात राहून अमली पदार्थाचे रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील आरोपीचे प्रकरण समोर आले. चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे पुणे पोलिसांना दुसरा धक्का बसला. आता पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, ललित पाटील प्रकरणात तीन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची दीड महिन्यात चौकशी पूर्ण केली जाणार आहे. 3 वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची दीड महिना चौकशी करणार आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ससून रुग्णालय प्रकरणी रुग्णालयात बंदोबस्तासाठी असणारे गार्डही रडारवर आले आहे. प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून 360 पोलीस गार्डची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात या चौकशीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
ललित पाटील हा 3 जून 2023 पासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या ज्या आजारांवर उपचार होते होते, ते आठ पंधरा दिवसांत बरे होतात. परंतु ललित पाटील याचा ससूनमधील मुक्काम वाढतच होता. त्या माध्यमातून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवता होता. आता पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीतून कोणाचा सहभाग आहे? हे स्पष्ट होणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठतांकडून अजून कोणतीच पावले उचलली गेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.