पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट सुरु होते. जून महिन्यापासून रुग्णालयात दाखल असलेला आरोपी ललित पाटील अमली पदार्थांचे रॅकेट रुग्णालयातून चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी कारवाई केली होती. पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे अमली पदार्थ जप्त केले होते. या ड्रग्सला MD म्हणजेच मेफिड्रोन नावाने ओळखले जाते. त्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असताना ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला.
ससून रुग्णालयात कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. ललित पाटील यांच्यावर जून महिन्यापासून या कक्षात उपचार सुरु आहे. त्याच्यावर ज्या आजारांवर उपचार सुरु होते, ते आजार आठ, पंधरा दिवसांच बरे होतात. परंतु त्यानंतरही त्याचा मुक्काम रुग्णालयात होता. कारण या ठिकाणी बसून तो अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवत होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरु होणार होती. परंतु छातीत दुखत असल्याचे सांगत एक्स रे काढण्यासाठी जात असताना तो फरार झाला. त्याची चौकशी होणार असल्यामुळे तो फरार झाला की त्याला फरार करण्यात आले? हा प्रश्न आता चर्चेत येत आहे.
ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्कर प्रकरणी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आरोपी करा, असा अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड न्यायालयात विशेष सरकारी वकीलाकडून हा अर्ज दाखल झाला आहे. यामुळे रुग्णालयातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ललित पाटील फरार झाल्यानंतर रुग्णालयाच्या कारभारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. या ठिकाणी कैदी महिने महिने कसे उपचार घेतात? या प्रकरणात कोणाचे हितसंबध आहेत, असे प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.