योगेश बोरसे, पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात चार दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला होता. वैद्यकीय प्रवेशासाठी 16 लाख रुपयांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक झाली होती. पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगीनवार यांच्यावर ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयात लाच प्रकरणात एका लिपिकास पकडले गेले. या प्रकरणी ससून रुग्णालयाकडूनही पावले उचलली गेली आहे.
वैद्यकीय बिलात त्रुटी न काढण्यासाठी लाच घेणारा ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरेश गायकवाड (वय ४९) याला पकडण्यात आले. अडीच हजारांची लाच घेताना त्याला अटक झाली. ससूनच्या अधीक्षक कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीकरीता प्रलंबित होती. त्यासाठी गायकवाड याने लाच मागितली होती.
पुणे ससून रुग्णालयातील लाच प्रकरणात लिपिकाला एसीबीने पकडले. यामुळे या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही कारवाई केली. गणेश गायकवाड याला लाच घेताना पकडल्यानंतर तासाभरात ही कारवाई करण्यात आली.
वैद्यकीय विभागातील वैद्यकीय बिले पास करण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. परंतु एखाद्या विभागातील लिपिक हे करु शकत नाही. यामुळे अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात आली. ससूनमध्ये गेल्या दोन वर्षांत तीन, चार अधीक्षक बदलले गेले आहेत. आता जाधव यांचीही उचलबांगडी झाली आहे. यामुळे रुग्णालयात काय सुरु आहे? हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.