पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे ससून रुग्णालयातून ड्रग्सचा रॅकेट चालवणारा ललित पाटील हा दोन दिवसांपूर्वी फरार झाला होता. जून महिन्यापासून रुग्णालयात राहून तो आपले ड्रग्सचे रॅकेट चालवत होता. त्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर रुग्णालयातून तो पसार झाला. त्यानंतर ससून रुग्णालयातील कारभारावर चौफेर टीका होऊ लागली. यामुळे ससून रुग्णालय अलर्ट मोडवर आले आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन कैद्यांना तातडीने डिस्चार्ज देण्यात आले. त्यात एक पुरुष तर एक गर्भवती महिला कैदीचा समावेश आहे. पुरुष कैदी ससून रुग्णालयाच्या १६ नंबरच्या वार्डमध्ये होता.
नांदेड आणि छत्रपती संभाजी नगरमधील घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. पुणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला गेला. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयाला भेट देत आयुक्तांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाला लागणाऱ्या आवश्यक सुविधांची त्यांनी पाहणी केली. राजीव गांधी रुग्णालयात लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयुक्तांकडून रुग्णालयाला नव्याने निधी देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
पुणे जिल्ह्याच्या रिंग रोडसाठी 636 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रिंग रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. या निधीचा वापर करुन पंधरा गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर निधी देऊन रिंग रोडसाठी जमीन दिला जाणार आहे. पुणे जिल्ह्यात 172 किलोमीटर लांबीचा रिंग रोड बनणार आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत 46 बिबटे मृत्यूमुखी पडले आहेत. बिबट्यांचा मृत्यू एकमेकांमधील भांडणातून झाल्याचा वनखात्याचा अहवाल आहे. तसेच रस्त्यांवरील अपघातांमुळे देखील बिबट्यांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर ,मावळ आणि मुळशी भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांना जंगलात भक्ष्य मिळत नसल्यामुळे त्यांनी शहरे आणि गावांमध्ये धाव घेतल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी पुण्यात शेवटची बैठक होणार आहे. अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील जिल्हा नियोजन समितीची पुण्यात बैठक घेणार आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची अखेरची बैठक असणार आहे. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या साडेचारशे कोटींच्या कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.