पुणे : पुणे शहरातील वातावरण थंड आहे. त्यामुळे देशातील सर्वात चांगेल शहर म्हणून पुण्याची ओळख झाली आहे. अनेक जण रोजगारासाठी पुण्याची वाट धरत असताना अनेकांनी निवृत्तीनंतर पुणे शहरात वास्तव करण्यास प्राधान्य दिले आहे. पुणे शहरच नाही पुणे परिसरात चांगले वातावरण आहे. परंतु आता पुणे परिसरातील तापमानात बदल होत आहे का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या काही दिवसांत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताची प्रकरणे वाढली आहे. या परिसरातून सुमारे 200 जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे.
इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म (IHIP) या संस्थेने पुणे सातारा आणि सोलापूर परिसरातील माहिती जारी केली आहे. त्यानुसार मार्च 2023 पासून आतापर्यंत एकूण 2.31 लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. सुदैवाने या तीन जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने एकाचाही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. यासंदर्भातील माहिती सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शहरातील सरकारी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये अशा एकूण 458 आरोग्य युनिटमधून संकलीत केली आहे.
उष्मघातामुळे पुणे परिसरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु महाराष्ट्रात एकूण 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. मार्चपासून आतापर्यंत एकूण 2,649 उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहे. त्यात रायगड जिल्ह्यात 412 प्रकरण आहे. त्यानंतर वर्ध्यात 334 उष्माघाताचे रुग्ण आढळले, त्यानंतर नागपुरात 317 रुग्ण आढळले आहेत.
उष्माघाताच्या रुग्णांची संख्या चंद्रपूर, नंदुरबार, अमरावती, लातूर, मुंबई-उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यात मोठी आहेच. उष्मघात टाळण्यासाठी रोज किमान चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. उष्णतेमुळे थकवा हा सौम्य प्रकारातील आजार आहे, परंतु उपचार न केल्यास उष्माघात होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.