Pune Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांच्या मृतदेहावर दांड्याने मारल्याचा खुणा, पोलिसांकडून महत्त्वाची माहिती

| Updated on: Dec 09, 2024 | 10:19 PM

पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला आहे. सतीश वाघ यांचे सकाळी शेवाळवाडी येथून अपहरण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. या हत्या आणि अपहरणाच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांच्या मृतदेहावर दांड्याने मारल्याचा खुणा, पोलिसांकडून महत्त्वाची माहिती
Follow us on

पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं आधी अपहरण आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात आढळून आला आहे. घटनास्थळी डॉग स्कॉर्ट, त्याचबरोबर सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सतीश वाघ यांचं आज सकाळी पुण्यातल्या शेवाळवाडी येथून अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांकडून अद्याप गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही. मात्र सतीश वाघ यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचा मृतदेह अतिशय निर्जनस्थळी जंगलात फेकून दिलाची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत. या दरम्यान पुण्याचे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा असून त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. वाघ यांची सकाळीच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे.

काय-काय घडलं?

सतीश वाघ यांचं आज सकाळी अपहरण झालं होतं. ते सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी चारचाकी गाडी घेऊन 4 अज्ञात आरोपी आले. त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्ती गाडीत बसवलं. सतीश वाघ यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींची संख्या जास्त असल्याने सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात त्यांना यश आलं. यानंतर आरोपी ब्ल्यू बेरी हॉटेल परिसरातून सतीश वाघ यांचं अपहरण करुन पळून गेले.

हे सुद्धा वाचा

सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सतीश वाघ यांचा शोध सुरु केला होता. पण पोलिसांना सतीश वाघ आणि त्यांच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात यश आलं नाही. या दरम्यान सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात आढळला. त्यानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे याची प्रचिती सर्वांना आली आहे. आता पोलीस या प्रकरणात काय-काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.