पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालला याआधी पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची आज कोठडी संपणार असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालची पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने त्यास स्पष्ट नकार दिला. विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. तसेच कोर्टाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
“विशाल अग्रवालवर आज पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. याप्रकरणी आम्हाला आणखी तपास करायचा आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांची पोलीस कोठडी आम्हाला मिळावी”, अशी मागणी पुणे पोलिसांनी आज कोर्टात युक्तिवाद करताना केली. पण कोर्टाने या प्रकरणी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट केलं. तसेच न्यायालयीन कोठडीत चौकशी केली जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
“पुणे अपघात प्रकरणी कलम 420 लावण्यात आलंय. आरोपी विशाल अग्रवालच्या घराबाहेर रजिस्टर ताब्यात घेण्यात आलं आहे. विशाल अग्रवालच्या घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. सायबर तज्ज्ञांकडून तपास करायचा आहे. अल्पवयीन आरोपीने कोझी हॉटेलमध्ये 47 हजारांचं बिल भरलं आहे. त्यामुळे अकाउंट्सची माहिती घेणं आवश्यक आहे. अपघातातील गाडी ‘ब्रह्मा लेजर्स’ कपनीच्या नावाने खरेदी केलेली आहे. घराचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. मात्र त्यात छेडछाड केल्याचा संशय आहे. अल्पवयीन आरोपीसोबत त्याच्या मित्रांनी दारुसह अन्य कशाचं सेवन केलं होतं का? हे तपासायचं आहे. त्यामुळे विशाल अग्रवालसह त्याच्या साथीदारांची आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
“ही अपघाताची केस आहे. मात्र यामध्ये मीडिया ट्रायल सुरु आहे. 1 हजार 758 रुपये फी भरली नाही म्हणून शासनाची फसवणूक केल्याचं म्हणत अगरवालांवर कलम 420 लावलं. आरोपीने पॉकेटमनीतून पबमध्ये पैसे भरले की बँक खात्यातून याचा तपास करावा. पैसे कुठून भरले याचा तपास करायला पोलिसांना वेळ का लागतो?”, असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केला.
“पोलिसांना जो काही तपास करायचा होता त्यासाठी एवढा वेळ का लागतोय? विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने पैसे नेमके कुठून भरले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यका काय?”, असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केला.