Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी सुरु झाली ही नवीन सुविधा, घरबसल्या घेता येईल लाभ

| Updated on: Aug 29, 2023 | 8:14 AM

pune sinhagad fort : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगडावर भटकंतीसाठी अनेक जण जातात. त्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न वनविभाग आणि पर्यटन महामंडळ करीत आहे.

Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी सुरु झाली ही नवीन सुविधा, घरबसल्या घेता येईल लाभ
sinhagad fort
Follow us on

पुणे | 29 ऑगस्ट 2023 : गड, किल्ल्यांमध्ये साहसी मोहिमांची आखणी करुन फत्ते करण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. पुणे जिल्ह्यात साहसी पर्यटनासाठी अनेक जण येत असतात. पुणे जिल्ह्यात अनेक गड अन् किल्ले आहेत. यामुळे शिवनेरीपासून सिंहगड किल्ल्यापर्यंत सर्वच ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. पुण्यापासून सर्वात जवळचा किल्ला असलेला सिंहगडावर शनिवारी, रविवारी अन् सुटीच्या दिवशी अनेक जण गर्दी करतात. गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे.

काय केली सुविधा

पुणे शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. शहरातून तासाभरात किल्ला गाठता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पीएमटीच्या बसेसची सुविधा आहे. यामुळे पुणेकर नेहमी किल्ल्यावर भटकंती करण्यासाठी येतात. सुटीच्या दिवशी किल्यावर अधिकच गर्दी होते. यामुळे पर्यटकांना तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागते. परंतु आता सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढता येणार आहे. पुणे वनविभागाकडून ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे किल्यावर येणाऱ्या पर्यटकांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे.

किती जणांनी घेतला लाभ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा मागील आठवड्यात सुरु झाली. आठवड्याभरात 600 पर्यटकांनी ऑनलाइन शुल्क भरले. ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून वनविभागाला एकूण 38 हजार 750 रुपयांचे उत्पन्न मिळाले. पर्यटकांनी या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

राहण्यासाठी करता येते ऑनलाईन बुकिंग

सिंहगडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीचे रिसोर्ट आहे. या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. हे रिसोर्ट सिंहगडावरच्या हवा पॉईंटजवळ आहे. एमटीडीसीच्या https://www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यासाठी बुकींग करता येते.

 

सिंहगडाचे वैशिष्ट काय

पुण्याच्या नैर्ऋत्येला सिंहगड किल्ला आहे. तानाजी मालूसरे यांच्या पराक्रमामुळे कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड झाले. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत हा किल्ला आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतात.