पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहर शिक्षणाचे केंद्र झाले आहे. पुणे शहरात अनेक विद्यापीठे आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी शिक्षणाबरोबर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची पदवी देणारी महाविद्यालये आहेत. यामुळे पुणे शहरात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. विविध अभ्यासक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी कोचिंग क्लासेसची संख्या सर्वाधिक आहे. आता पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी मिशन मेडीकलमध्ये आघाडी घेतली आहे. मुंबई दुसऱ्या क्रमाकांवर तर लातूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पुणे शहरातून वैद्यकीय अभ्यासक्रमसाठी यश मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. राज्यातील सार्वजनिक आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणारे सर्वाधिक विद्यार्थी पुणे येथील आहे. सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 7,210 विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्यात सर्वाधिक विद्यार्थी पुणे येथील 739 आहे. पुणे शहरानंतर मुंबई येथील 608 तर लातूरमधील 580 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ठाणे आणि अहमदनगरमधील अनुक्रमे 448 आणि 438 विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेला आहे.
राज्यातील लातूर, नगरसारखी शहरांमधील विद्यार्थी यशस्वी होत असताना काही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना कमी यश आले आहे. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांचे एमबीबीएस शिक्षणाकडे जाण्याचे प्रमाण अल्प आहे. सिंधुदुर्गमधील केवळ पाच उमेदवार आहेत. पुणे, मुंबईत कोटा शहराप्रमाणे नीट परीक्षेचे कोचिंग घेणाऱ्या संस्था आहेत. लातूरमधील कोचिंगमध्ये प्रवेशासाठी चांगलीच गर्दी असते. यामुळे या शहरातील यशाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
राज्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परीक्षा दिली. देशभरातून वीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंद असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पुणे शहरातील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यामागे खासगी कोचिंग क्लासेसची वाढलेली संख्या हे एक कारण आहे. गेल्या काही वर्षांत लातूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे कोंचिग क्लासेस वाढले आहे. यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना यश मिळू लागले आहे.